बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाची यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी गजानन बेजंकीवार यांची नियुक्ती
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-शुभम बावणे
यवतमाळ , ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाची यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी आज शुक्रवारी घोषित करण्यात आली. यात आर्णी व वणी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे विश्वासू सहकारी गजानन बेजंकीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेजंकीवार यांच्या नियुक्तीने आर्णी आणि वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटन वाढीसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळवता येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. गजानन बेजंकीवार हे पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
शिवसेनेच्या माध्यमातून 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण या सुत्रानुसार त्यांची घोडदौड सुरू आहे. परिसरात यशस्वी युवा उद्योजक म्हणूनही ते परिचित आहेत. जिल्हा परिषद सदस्य, सभापती तथा पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. ते आपल्या निवडीचे श्रेय ना. संजय राठोड यांना देतात.
दिलेली जबाबदारी पार पाडून पक्ष संघटन वाढीसोबतच जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आणि परिसरात विकासात्मक कामांसाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असा विश्वास गजानन बेजंकीवार यांनी जिल्हाप्रमुखपदी निवडीनंतर व्यक्त केला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.