रांझणी येथे आढळले दोन कन्नड शिलालेख

रांझणी येथे आढळले दोन कन्नड शिलालेख 




पंढरपूर पासून १२ किमी अंतरावर असलेल्या रांझणी या गावी दोन शिलालेख अशात आढळले असून ते सुमारे ८०० वर्ष पेक्षा जुने आहेत. रांझणी शिरगाव रोड लगतच्या श्री सीताराम भारत दांडगे सर यांच्या शेतीच्या बांधावर एकाच शिलालेखाचे २ तुकडे सापडले आहेत. एका तुकड्यावर सूर्य, चंद्र, शिवपिंड, गाय-वासरू, तलवार हे कोरलेले आहेत. दुसऱ्या तुकड्यावर हळे कन्नड लिपीतील ७ ओळींचा शिलालेख आहे. त्यात संस्कृत श्लोक आहे. त्यात राजवट, देवता, तिथी इत्यादींचा उल्लेख नसून फक्त शापाशय भाग शिल्लक आहे. याचा अजून एक तुकडा गहाळ आहे. 



या पहिल्या शिलालेखचे वाचन “इ धंम्ममं प्रतिपाळिसुवरु सुखियप्परू प्रतिकूलरादवरू वारणासियल्लु सायिर मनुस्य ब्रह्मणरं सायिर कविलेयं वधिसीधवरु” असे आहे. याचा अर्थ “जे कोणी या ठरलेल्या धर्माचे अर्थात शिलालेखातील मजकुराचे पालन करेल तो सुखाचा लाभार्थी होईल आणि जो कोणी हे धर्म शासन पाळणार नाही तो वाराणसी या पवित्र धर्म क्षेत्र स्थळी १००० ब्राम्हण मनुष्य व १००० गाई मारलेल्या पातक त्याला लागेल” असा आहे.


दुसरा शिलालेख चळे रस्त्यालगत शेतात गावच्या उत्तर दिशेस आहे. तो २ ओळींचा असून हळे कन्नड लिपीत व तत्कालीन भाषेत आहे. त्यावर वरील बाजूस सूर्य, चंद्र, शिवपिंड कोरले आहेत, त्याखाली शिलालेख आहे व त्याखाली गाय, वासरू व तलवार कोरलेले आहे. त्याचे वाचन “पेगळाय सिद्द्नाथदेवर चीलाळादेवगं केइ” असे आहे. त्याचा अर्थ “पेगळचा सिध्दनाथ देव याच्या अंतर्गत किंवा संबंधित चीलाळा देवाची ही जमीन आहे” असा आहे.


 या दुसऱ्या शिलालेखाची सध्या महालक्ष्मी म्हणून पूजा करतात. पूर्वी हा शिलालेख बांधावर उभा होता. सध्या तो थोडा बाजूस हलवून आडवा ठेवला आहे. हा शिलालेख चीलाळा देवाला दान दिलेल्या जमिनीचे स्थान व हक्क सांगणारा आहे. या शिलालेखातील पेगळा हे ग्रामनाम आहे. मात्र हे पडताळणी केली असता जवळ पासच्या गावांशी जुळून आले नाही. चिलाळा हे एक व्यक्तिनाम सिध्दनाथ देवाच्या संबंधित व्यक्तीचे असावे किंवा त्यांच्या अंतर्गत असलेल्या उपदेवतेचे नाव असावे. वीर शैव साहित्यात चिलाळा किंवा चिल्ला या व्यक्ती बद्दल कथा मिळते. जो की शिवभक्त राजा होता व नंतर त्याने चिलाळा संप्रदाय स्थापन केला. त्यास चिलाळा समय असेही म्हणतात. दान दिलेल्या जमिनीवर उभा केलेला, त्या जमिनीवर तत्कालीन हक्क सांगणारा हा एक दुर्मिळ शिलालेख आहे. यावर अधिक संशोधन चालू आहे. 


या दोन्ही शिलालेखांचे वाचन डॉ. देवरकोंडा रेड्डी यांनी केले असून क्षेत्र कार्य व संशोधन कृष्णा गुडदे व दत्तात्रय सरीक यांनी केले आहे. यावेळी त्यांस सीताराम दांडगे, महादेव घाडगे, नवनाथ ढोले, समाधान औताडे इत्यादींची मदत झाली आहे. या दोन्ही शिलालेखांच्या उपलब्धी व  उलगड्या मुळे रांझणी गावच्या इतिहासात भर पडली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad