स्वच्छ वारी, निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाचा समारोप

 स्वच्छ वारी, निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी

            -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाचा समारोप


*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'वारी महाराष्ट्र धर्म' कॉपी टेबल बुक च प्रकाशन


*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने विषयी सादरीकरण करणाऱ्या कला पथकाला मुख्यमंत्र्याकडून राज्यभरात जनजागृती करण्याचे काम



पंढरपूर, दिनांक 17:- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून यातून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होत आहे. पुढील काळात स्वच्छ वारी निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

         पंढरपूर पंचायत समिती परिसरात आयोजित स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कृषी भूषण गोविंदराव पवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

        मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की स्वच्छ वारी निर्मल वारी सारख्या उपक्रमामधून स्वच्छतेबरोबर पर्यावरण संवर्धनाचे कामही होणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या असमतोलामुळे सन स्ट्रोक हिट स्ट्रोक अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. याला पर्याय म्हणून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. बांबू लागवड केल्याने मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळत आहे, त्यामुळे नागरिकांनी बांबू लागवडीला महत्त्व द्यावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

         पर्यावरणाचे महत्त्व ओळखून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही एक झाड आपल्या आईच्या नावाने लावण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केलेले आहे. त्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवडीस प्राधान्य द्यावे. तसेच राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेला एक लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार असून या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राज्यभरात राबवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

        पंढरपूर शहरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने चार महाआरोग्य शिबिरे घेण्यात आली यामध्ये आतापर्यंत दहा लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे. ही आरोग्य शिबिरे वारकरी भाविकांसाठी आरोग्यवर्धिनी ठरत आहेत. 65 एकर येथे अतिदक्षता विभाग स्थापन करून या माध्यमातून वारकरी भाविकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या माझी लाडकी बहीण योजना बरोबरीने अन्य महत्वपूर्ण योजनांची माहिती दिली. 

    कॉफी टेबल बुक चे प्रकाशन-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने स्वच्छ वरील निर्मल वारीच्या पार्श्वभूमीवर 'वारी महाराष्ट्र धर्म' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ग्राम स्वच्छता विभागाच्या लोगोचे अनावरण ही झाले. 


*जिल्हा परिषदेच्या कला पथकाचा गौरव

 व राज्यभर कला सादर करण्याची संधी-

स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमात कला पथकाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आले. या काल पथकाच्या वेगळ्या सादरीकरणाच्या पद्धतीमुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेची राज्यभरात प्रसिद्धी करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या या कला पथकाला देऊन या कला पथकाच्या कामाचा गौरवही केला व त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला.

      स्वच्छ वारी निर्मल वारी या उपक्रमाची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आपल्या प्रस्ताविकात दिली. यावर्षी ग्रामविकास विभागाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला दहा कोटीचा भरीव निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देणे जिल्हा परिषदेला शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. या समारोप कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


                ***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad